रिअल इस्टेट क्षेत्रात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी आई
आई होणं ही माझ्यासाठी मला मिळालेली सर्वात मोठी भेट
मुंबई : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात एका महिलेने उत्तम कामगिरी करत आपलं स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मंजू यागनिक या रिअल इस्टेट क्षेत्रातील नाहार ग्रुपच्या उपाध्यक्ष पद भूषवत असून यांनी त्यांच्या क्षेत्रात प्रगती करत चांगली उंची गाठली आहे. एक आई आणि व्यावसायिका अशा दोन्ही भूमिका त्या चोखपणे साकारत आहेत. माझी मुलं माझं जग आहे आणि आई होणं ही माझ्यासाठी मला मिळालेली सर्वात मोठी भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय.
वैयक्तिक जीवनात कला आणि डिझाइन मला उत्साहित करतात. चांगली गोष्ट म्हणजे माझी आवड आणि माझा व्यवसाय समान आहेत. मला चांगल्या घरांची नेहमीच आवडत होती. घरे बांधण्यासाठी पायाभूत सुविधा, कौशल्य आणि तंत्रज्ञानाने मला उत्साहित केले. या क्षेत्रात जरी अनेक महिला नव्हत्या तरीही मी माझ्या कौशल्यांचा अशा व्यवसायात वापर करण्याचा विचार केला. हे आव्हानात्मक तर होतं, पण माझी ही आवड होती. त्या काळादरम्यान, रिअल इस्टेट उद्योग आज जितका सुसंघटित आहे तितका नव्हता, म्हणून मला आव्हानांचा सामना करून या क्षेत्रात एक चांगलं नाव कमवायचं होतं. माझ्या कुटुंबाने माझ्या निर्णयांचे नेहमीच स्वागत केलं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवला. मला खात्री आहे की माझ्या प्रवासाचा त्यांना अभिमान आहे आणि ते पुढेही मला पाठिंबा देत राहतील.
जेव्हा मी रिअल इस्टेट क्षेत्रात माझा प्रवास सुरू केला, तेव्हा हा उद्योग खुला आणि पारदर्शी नव्हता. सर्वात भयंकर म्हणजे एका स्त्रीच्या नेतृत्वाखाली गुंतवणुकदार आणि भागीदारांना गुंतवणूक करण्यात खात्री वाटत नसे. पण वेळेनुसार गोष्टी बदलत गेल्या. मला संपूर्ण क्षेत्राकडून आज आधार मिळत आहे आणि आज महिलांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणं अधिक विश्वासाचे वाटत आहे.
या क्षेत्रात ३० वर्षांपासून राहिल्याने मला एक गोष्ट समजली आहे की 'आवड आणि व्यवसाय समान असावे. जर एखाद्याला व्यवसायप्रती आवड असेल, तर तो त्यामध्ये यशस्वी होईल.' यश हे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि दृढनिश्चय यांसारख्या विविध गोष्टींचे मिश्रण आहे. जर तुम्ही इच्छित ध्येये साध्य करण्यासाठी उत्सुक असाल आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल, तर यश तुमच्या पाठीशी असेल असं त्यांनी म्हटलंय.
काम करणारी आई होणं आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये महिला होणं या दोन्ही गोष्टी समानरित्या आव्हानात्मक आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांसाठीही राहायचे आहे आणि आपल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरीही करायची आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी महिलांना स्वतःवर विश्वास ठेवा, निर्भय राहा, आपल्याला जीवनात काय पाहिजे आहे ते जाणून घ्या, नेहमी नम्र रहा आणि अधिक नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहण्याचा सल्ला दिला आहे.