मुंबई : कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना मृत्यू दर रोखणे महत्त्वाचे, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको, अशी सक्त ताकीद दिली आहे. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यावेळी हे निर्देश दिलेत. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.



मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे, कारण रुग्ण संख्या वाढत आहे. यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात, त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत. 


वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत, हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सूचना असतांना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून कोणत्याही परिस्थितीत ढिलाई नको, असे स्पष्ट बजावले.


कोरोनाबाबत ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत, त्याप्रमाणे झालेच पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत, कनिष्ट डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत, असे निदर्शनास आले आहे. या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक, स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले.



आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे असे ते म्हणले. जिल्ह्यांमध्ये इंडियन  मेडिकलब असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी, असेही सांगितले.