मुंबई : ताह आपल्या घरी परतणार होता. यामुळे घरातील सगळे आनंदी झाले होते. मात्र, अचानक त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली आणि त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. नेमकं काय घडलं याची माहिती त्यांना मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजीनगर येथील आपल्या घराजवळ ताह आजम खान (वय वर्ष २) समवयस्क मुलासोबत खेळत होता. अचानक त्याला उलट्या आणि जुलाबांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला जवळच्या नूर रुग्णालयामध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळणार होता.


मात्र, डिस्चार्ज मिळण्याच्या आदल्या दिवशी एका नर्सच्या हातून ती चूक घडली. त्या नर्सने ताह याच्या बाजूच्या बेडवर असलेल्या १६ वर्षाच्या मुलाला द्यायचं इंजेक्शन दोन वर्षाच्या ताहला दिलं. त्या इंजेक्शनचा प्रभाव लगेच दिसून आला. अवघ्या काही वेळातच ताहला अस्वथ वाटू लागले आणि पुढील उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


ताह याच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर रुग्णालय प्रशासनाने जेव्हा चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ताह याला कुण्या नर्सने नाही तर एका सफाई काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने इंजेक्शन दिले होते. त्या महिला कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे ताहला आपला जीव गमवावा लागला. 


याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ताहच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापक, डॉक्टर, नर्स, इंजेक्शन देणारी ती सफाई कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अजून कोणालाही अटक झालेली नाही. तसेच मुलाला टोचलेले इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.