Viral Video: रेल्वे स्थानक म्हणजे सर्वसामान्यांसाठी दैनंदिन आयुष्याचा एक भाग आहे. रोज कामाला जाण्यासाठी लाखो चाकरमानी लोकलने प्रवास करत असतात. गर्दीने भरलेल्या खचाखच लोकलमधून जीव धोक्यात टाकत अनेकदा मध्यमवर्गीय प्रवास करत असतात. तर काहीवेळा प्रवाशीच नियमांचं पालन न करता संकटाला आमंत्रण देत असतात. धावत्या लोकलमधून उतरताना, चढताना जखमी झालेल्या अनेक प्रवाशांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामुळे रेल्वे पोलीस वारंवार प्रवाशांना सुरक्षेसंबंधी सूचना करत असतात. आपण जर त्याच्याकडे नीट लक्ष दिलं नाही तर काय होऊ शकतं हे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर (Malad Railway Station) एक मोठी दुर्घटना घडली आहे. एसी रेल्वेने धडक दिल्याने एका 17 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. आपली एक चूक तरुणाच्या जीवावर बेतली आहे. ही दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारा येईल. धडक इतकी जबरदस्त होती की तरुणाने जागीच आपला जीव गमावला. 


नेमकं काय झालं?


मयांक अनिल शर्मा असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो मालाड मालवणी येथे राहतो. व्हिडिओत दिसत आहे, त्यानुसार मयांक आपल्या मित्रासह मालाड रेल्वे स्थानकावरील तीन क्रमांक प्लॅटफॉर्मवर बसलेला होता. यावेळी दुपारचे साडे तीन वाजलेले होते. मयांकने आपल्या मित्रासह तिथेच बाकावर बसून जेवण केलं. जेवून झाल्यानंतर त्याचा मित्र हात प्लॅटफॉर्मच्या किनारी जाऊन हात धुवत उभा असतो. यानंतर काही वेळाने मयांक उभा राहतो आणि तोदेखील तिथेच जाऊन हात धुतो. 


मयांकचा मित्र पाण्याची बाटली त्याच्याकडे देतो. मयांक हात धुत असताना त्याची पाठ असल्याने मागून ट्रेन येत असल्याचं त्याला समजतच नाही. त्याचा मित्रही यावेळी बाकावर बसलेल्या आपल्या दुसऱ्या मित्राशी गप्पा मारत असल्याने ट्रेन वेगाने आपल्या दिशेने येत आहे हे त्यालाही कळत नाही. 



हात धुणाऱ्या मयांकला पुढील काही सेकंदात काय होणार याची अजिबात कल्पना नसते. मयांक हात धुत असतानाच मागून वेगाने आलेली चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने जाणारी एसी लोकल त्याला उडवते. त्याच्या मित्राला शेवटच्या क्षणी ट्रेन दिसतो आणि तो वाचण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, ट्रेनने धडक दिल्यानंतर अनिल अक्षरश: हवेत उडतो आणि काही अंतर दूर जाऊन पडतो. दुसरीकडे मयांकचा धक्का लागल्याने त्याचा मित्रही खाली कोसळतो. यानंतर त्याचे दोन्ही मित्र आणि स्थानकावरील प्रवासी मयांकच्या दिशेने धाव घेतात. 


लोकलने दिलेल्या जबर धडकेनंतर मयांकच्या कानातून रक्तस्त्राव सुरु होतो. यानंतर स्टेशन मास्तर पोलीस कर्मचाऱ्याला त्याला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेण्याची सूचना देतात. मयांकच्या मित्राच्या सहाय्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला दाखल होताच मृत घोषित केलं.