मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही ट्विट करुन आज घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत, असं फडणवीस म्हणाले आहेत. गेल्या 5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्य प्रकारे, योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षाही फडणवीसांनी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शरद पवार यांच्या घरावरचा हल्ला हा राजकीय हेतूनं झाला आहे.' असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानाबाहेर दुपारी तुफानी राडा झाला. संतप्त एसटी कर्मचारी गनिमी काव्यानं पवारांच्या घरी धडकले आणि त्यांनी जोरदार आंदोलन केलं. पवारांच्या घरावर चप्पलफेक आणि दगडफेक करण्यात आली. एसटी कर्मचा-यांनी यावेळी पवारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.


आंदोलनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सिल्व्हर ओकवर पोहोचल्या. त्यांनी हात जोडून त्यांना शांततेचं आवाहन केलं. तब्बल तासभर ही सगळी धुमश्चक्री रंगली. एसटी कर्मचा-यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील सिल्व्हर ओकबाहेर जमले. त्यावेळी एसटी कर्मचारी विरुद्ध राष्ट्रवादी कार्यकर्ते असाही संघर्ष झाला. अखेर पोलिसांनी कसंबसं सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं.


एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे. मात्र चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.