मुंबई : युवासेना अध्यक्ष आणि आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी वांद्र्यातील रंगशारदा इथं शिवसेना आमदारांशी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी जवळपास दीड तास आमदारांशी चर्चा केली. सेनेचे सारे आमदार हे वांद्र्यातील रंगशारदा हॉटेल इथं वास्तव्यास आहेत. रात्रभर हॉटेलवर सेना नेते आमदारांची भेट घेण्यासाठी येत होते. अरविंद सावंत, रामदास कदम, अनिल देसाई, मंजेश कुडलकर यांनी रंगशारदावर येऊन सेना आमदारांची भेट घेतली. सेनेच्या आमदारांचा आगामी दोन दिवस रंगशारदा हॉटेलमध्येच मुक्काम असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे आमदार कालपासून रंगशारदा हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतच थांबवण्यासाठी सांगितलं असल्याचं आमदारांनी म्हटलं आहे. शिवसेना आज नरमाईची भूमिका घेते की अन्य पर्यायांचा विचार करते, याभोवती सत्तास्थापनेचं नाट्य रंगेल. 


सत्तासंघर्षाचा आजचा १६ वा दिवस आहे. आज १३ व्या विधानसभेचा कार्यकाल संपत असल्यानं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. एक तांत्रिक बाब म्हणून फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे आता राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून राज्यपालांच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.