मुंबई : भरपावसात शरद पवारांनी केलेलं भाषण प्रत्येकाच्या लक्षात असेलच, याचीच आठवण बुधवारी आदित्य ठाकरे यांनी करून दिली आहे. निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी धो-धो पावसात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. बुधवारी वडाळ्यामध्ये त्यांची निष्ठा यात्रा सुरू होती आणि नेमका त्याचवेळी अचानक पाऊस आला. या पावसात भिजत आदित्य ठाकरेंनी भाषण केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही आता पाठ फिरवू लागलेत. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. मुंबईमध्ये सध्या आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसले.


भायखळ्यातील आग्रीपाड्यात शिवसेना शाखा क्रमांक 212 ला आदित्य ठाकरेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर टीका केली. उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, गद्दार हे गद्दारच असतात. त्यांचं नाव कितीही बदलली, त्यांनी कितीही गट बदलले तरी गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावरून पुसला जाणार नाही.


सत्ता नाट्याला आज 1 महिना झाला. राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरून दिलंय, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, म्हणून ताठ मानेनं उभे आहोत. गेलेले लपूनछपून, शिवसैनिकांना त्रास देतायत. लाज असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीका केलीये.


ते पुढे म्हणाले, आमचा कायद्यावर विश्वास आहे. हे सरकार पडणारच आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवायला हे निघालेत. आपण राजकारण करत नाही. आपल्याला राजकारण जमत नाही. त्यामुळे असा दिवस बघावा लागतोय. नेहमीच राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. मात्र आज आज जे शिवसैनिक भेट आहेत. ते पाहून असं वाटत राजकरणात चांगल्या लोकांना स्थान असतं."