मुंबई : राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून 12 दिवस उलटून गेले असूनही अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यात मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. यातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवासेना सदस्य राहुल कनाल यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांचा आदित्यसोबतचा फोटो शेअर केला असून काही दिवसात शिवतीर्थावर आवाज घुमेल... मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू आदित्य उद्धव ठाकरे ईश्वराची शपथ घेतो की.... अशी पोस्ट या फोटोत लिहिली आहे. 



शिवसेनेकडून आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री होणार असल्याच म्हटलं जातं आहे. त्याचप्रमाणे मातोश्रीवर बॅनरबाजी देखील करण्यात आली. माझा आमदार, माझा मुख्यमंत्री असं लिहून आदित्य ठाकरेंचा फोटो देखील लावण्यात आला. असं असताना सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का? की शिवसेना भाजपचा प्रस्ताव स्विकारून सत्तेत सहभागी होणार याकडेच लक्ष लागून राहिलं आहे.