मुंबई : देशासह महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. मुंबईतही कोरोनाने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहिलं असून त्यात काही मागण्या केल्या आहेत. हे पत्र आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रामध्ये आदित्य ठाकरे यांच्या मागण्या
आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यात लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा १५ करावी, जेणेकरुन महाविद्यालय आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचं लसीकरण करता येईल.  तसंच आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिसरा डोस देण्यात यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


देशात ओमायक्रॉनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, याचसंदर्भात काही दोन गोष्टी सुचवू इच्छितो असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. आपण वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर असं वाटतं की लसीकरणाची वयोमर्यादा १८ ऐवजी १५ करावी, त्यामुळे उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोना संरक्षण कवच पुरवता येईल. तसंच कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस देण्याबाबत परवानगी द्यावी असं या पत्रात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.



तसंच दोन लसींच्या डोसमधील अंतर चार आठवड्यांचा केलं तर जानेवारी २०२२ पर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचं उद्दीष्ट पूर्ण होईल. सध्या मुंबईत ७३ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


या मागण्यांसंदर्भात आपल्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे