कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई :  राज्य सरकारचा वन विभाग आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणी संग्रहालयासाठी लागणारी जमीन मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करीत आहे. यासाठीचा सामंजस्य करार होत आहे. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर मान्यवर उपस्थित असतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेस ९९ वर्षांच्‍या कालावधीकरिता रुपये १/- प्रमाणे भाडेतत्वावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय विकसित करण्याकरिता जमीन हस्तांतरित केली जातेय. जागा हस्‍तांतरित केल्‍यापासून सुमारे ४ ते ५ वर्षांच्‍या कालावधीमध्‍ये सदर प्राणी संग्रहालयाचा प्रत्‍यक्ष विकास करण्‍यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरे कॉलनीतल्या सुमारे १२० एकर क्षेत्रावर आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आरे कॉलनीतील हे प्राणी संग्रहालय हे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचा विस्‍तारित भाग राहील. 


सिंगापूर येथील प्रसिद्ध नाईट सफारीच्‍या संकल्‍पनेवर आधारीत 'नाईट झू-सफारी' या प्राणी संग्रहालयात विकसित करण्‍यात येणार आहे. केवळ मनोरंजनावर भर न देता दुर्मिळ वन्‍यजीवांच्‍या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन केंद्र म्‍हणून तसंच निसर्ग, वन्‍यजीव आणि पर्यावरण याबाबत जागरुकता निर्माण करणारे एक निसर्ग‍ शिक्षण केंद्र म्‍हणून हे प्राणी संग्रहालय कार्य करणार आहे. 


प्राणी संग्रहालयाच्या उभारणीपासून पुढील व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी मुंबई महापालिकेची राहील. प्राणी संग्रहालयापासून उत्पन्न होणारा निव्वळ महसूल महानगरपालिका आणि वनविभाग, महाराष्ट्र शासन यांच्यात ८०:२० समभागात विभागला जाईल. 


अशी आहे सिंगापूर नाईट सफारी