नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांचं `मुंबई` आणि `मराठी` कनेक्शन...
भारतीय अर्थतज्ज्ञाला मिळालेल्या या नोबेलचा अर्थातच अभिमान आहे पण त्यापुढे जात अभिजीत यांची मराठीशी आणि मुंबईशी घट्ट नाळ आहे
मुंबई : जन्माने मुंबईकर कर्माने कोलकाताकर आणि आता बोस्टनचे रहिवासी असलेले अभिजीत बॅनर्जी त्यांच्या पत्नी एस्थर डफलो आणि सहकारी मायकेल क्रेमेर यांना यावर्षीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. दारिद्र्य निर्मूलनासंबंधी त्यांचं संशोधन यंदाच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात येतंय. जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयोगशील सिद्धांत मांडणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. बॅनर्जी यांच्या पत्नी एस्थर डफलो, बॅनर्जींचे सहकारी मायकेल क्रेमेर यांनाही बॅनर्जींसह नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. अर्थशास्त्रात नोबेल पुरस्काराने गौरव होत असलेले बॅनर्जी हे डॉ. अमर्त्य सेन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय...
बॅनर्जी, डफलो आणि क्रेमेर यांनी जागतिक दारिद्र्य निर्मूलनाचा सामना करण्यासाठी प्रयोगाधिष्ठीत दृष्टीकोन मांडला. त्यातून उदयाला आलेली विकासात्मक अर्थशास्त्र ही शाखा लक्षवेधी आहे. १९९० च्या मध्यावधीत केनियात शाळांचे निकाल सुधारण्यासाठी काही धोरणात्मक प्रयोग केले. अभिजीत बॅनर्जी, एस्थेर डफलो आणि क्रेमर यांनी अशाच पद्धतीने अभ्यास करून इतर प्रश्नांचा विविध देशात वेध घेतला आणि त्यातून विकासात्मक अर्थशास्त्राचा उदय झाला. लाखो लोकांचं दारिद्र्य दूर करण्याची ताकद या संशोधनात आहे, असे गौरवोद्गार नोबेल पुरस्कार समितीने काढलेत.
नातं मुंबईशी... आणि मराठीशी
भारतीय अर्थतज्ज्ञाला मिळालेल्या या नोबेलचा अर्थातच अभिमान आहे पण त्यापुढे जात अभिजीत यांची मराठीशी आणि मुंबईशी घट्ट नाळ आहे हे नमूद करावं लागेल. अभिजीत यांच्या आई निर्मला पाटणकर या महाराष्ट्रीय... अभिजीत यांचा जन्म १९६१ साली मुंबईत झाला होता.
१९८८ मध्ये अभिजीत बॅनर्जी यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. त्यांचं शिक्षण कोलकाता आणि दिल्लीत जेएनयुमधून झालं. २००३ मध्ये त्यांनी अब्दुल लतीफ जमील दारिद्र्य निर्मूलन कृती प्रयोगशाळा सुरू केली. त्यात त्यांच्या पत्नी एस्थेर डफलो यांचाही समावेश आहे. दोघेही पती-पत्नी एमआयटीत प्राध्यापक आहेत. अभिजीत यांनी 'पुअर इकॉनॉमिक्स' या पुस्तकासह चार पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकाला 'गोल्डमन सॅश' पुरस्कारही मिळालाय. दोन लघुपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलंय.
दारिद्र्य निर्मूलन हा भारतासमोरचाही मोठा प्रश्न... यासंबंधी २००३ मध्ये बॅनर्जी आणि डफलो यांनी एमआयटीत प्रयोगशाळा सुरू केली. तब्बल ८१ देशांमध्ये या ९४१ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. यातल्या अनेक प्रयोगशाळा भारतात आहेत. भारतात त्यांचं मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. सरकारने इच्छाशक्ती दाखवत या संशोधनाचा करून घेतला तर मोठा फायदा निश्चितच दिसू शकतो.