`घोसाळकरांवर हल्ला करणारा हाफ चड्डीवरच, घडलेली घटना..`; `सरकारच्या बदनामी`चा उल्लेख करत अजित पवारांची प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी फेसबुक लाइव्हदरम्यान हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली.
Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी दहिसरमधील आयसी कॉलनीत मोरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. या हल्ल्यात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. तर अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मोरिस नोरोन्हा याने देखील स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना निमित्त मिळालेलं आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटातील दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नरोन्हाचे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी संबंध होते, असे दिसून येत आहे. या गोळीबारप्रकरणी अधिक माहिती पोलिसांकडून घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात तर दहिसरमध्ये फेसबुक लाईव्ह सुरु असताना हत्या घडल्याने कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना अजित पवार यांनी या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे, असे म्हटलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
"अशाप्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडताच कामा नये या मताचा मी आहे. व्हिडीओमध्ये संवाद ऐकून दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत असे वाटते. याचा नीट तपास झाला पाहिजे. झालेली घटना चुकीची आहे. पण पोलीस यंत्रणा बाहेर असली तरी दोघे आत बसले आहेत आणि चर्चा करत आहेत. त्यातील एकजण हाफ चड्डीवरच दिसतोय. दोघांचे संभाषण दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर त्याने हे कृत्य केले आहे. विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना निमित्त मिळालेलं आहे. पण नक्की काय झालं हे पाहण्यासाठी पाठीमागची पाश्वभूमी तपासली पाहिजे. याप्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चर्चा केली. दोघे एकमेकांची चेष्टामस्करी करत होते असे व्हिडीओमध्ये दिसत होते," असे अजित पवार यांनी म्हटलं.