`महापोर्टल बंद करा, सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या`
राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
मुंबई: फडणवीस सरकारच्या काळात सरकारी नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले महापोर्टल बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महापोर्टलबाबत अनेक तक्रारी आणि त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे हे महापोर्टल बंद करावे. त्याऐवजी आणखी चांगले पोर्ट सुरु करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच आपल्या या मागणीला आदित्य ठाकरे यांचाही पाठिंबा असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
महायुती सरकारच्या काळात ही पोर्टल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, दौऱ्यांच्यानिमित्ताने राज्यभरात फिरताना अनेक तरुणांनी महापोर्टलविषयी आपल्याकडे तक्रार केली होती. राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या मार्गात महापोर्टल सेवा ही मदत ठरण्याऐवजी अडचण निर्माण करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी मुखमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवी पोर्ट सेवा सुरु होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच परीक्षा पद्धत सुरु करावी, असेही सुप्रिया यांनी सांगितले.