९० पार केलेल्या रूग्णांची कोरोनावर यशस्वी मात...
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डाँक्टरांचे उपचार
मुंबई : वयोमानानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने कोरोनाचा सर्वांधिक धोका हा वयोवृद्धांना आहे. या विषाणूची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृद्धांचा आकडा अधिक आहे. परंतु, आता कोरोना या व्हायरसशी झुंज देत यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या वयोवृद्धांची संख्याही वाढू लागली आहे. जिद्दी व इच्छाशक्तीमुळे हे वृद्ध कोरोनामुक्त होऊन पुन्हा सर्वसामान्य जीवन जगतायेत, याचा प्रत्यय नुकताच आलायं.
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये सर्वच स्तरातील रूग्ण आढळून येत आहे. अशा स्थितीत वयोवृध्दांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे आणि म्हणून साठी उलटलेल्या वयोवृध्दाना धोका अधिक असल्याचे दिसून येत असतानाच मुंबई सेंट्रल येथील वोक्खार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या घनश्यामदास चंचलानी (९२) आणि माधुरी संपत (९१) यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
पनवेलमध्ये राहणारे घनश्यामदास चंचलानी (९२) यांना अचानक ताप येऊ लागला होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. म्हणून कोविडची शक्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांची स्वॅब टेस्ट आणि रक्तचाचणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. त्यानंतर कुटुंबियांना त्यांना उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केलं.
याशिवाय, ९१ वर्षीय माधुरी संपत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. या महिलेच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्याने त्या गेल्या सहा महिन्यांपासून अंथरूणात होत्या. परंतु, अचानक ताप आणि अंगदुखी होऊ लागल्याने त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी लघवीत इंफेक्शन असल्याचेही समोर आलं आहे. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
या रूग्णालयातील कन्सल्टेंट फिजिशियन आणि डायरेक्टर इंटरनल मेडिसिन डॉ. बेहराम पारडीवाला यांच्या देखरेखीखाली या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू होते.
यासंदर्भात बोलताना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉ. बेहराम पारडीवाला म्हणाले की,‘‘कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रूग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. रूग्णालयात आणलं तेव्हा त्यांना खूप ताप होता. कुटुंबियांची सुद्धा कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. यात चंचलानी यांचा मुलगा पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यालाही रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोघांवर औषधोपचार सुरू करण्यात आले. आम्ही दिवसातून तीन वेळी त्यांची ऑक्सिजन पातळी तपासत होतो. १२ दिवसांनंतर त्याची सामान्य ऑक्सिजन पातळी ९८ इतकी होती. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यानं त्याला घरी सोडण्यात आलं. त्यानंतर घरी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते.’’
रूग्णाचा मुलगा राजू चंचलानी म्हणाले की, ‘‘मी आणि माझे वडील आम्ही दोघेही कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आम्ही या आजारातून सुखरूप बाहेर पडू शकलो. याशिवाय व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही कुटुंबियाशी संवादही साधत होतो. परंतु आता बरे झाल्यानंतर घरी परत आल्यावर आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही पूर्वीप्रमाणे एकत्र येऊन सण साजरा करतोय. माझे वडील लवकरच मॉर्निंग वॉक पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहेत. यासाठी मनापासून डॉक्टरांचे आभार मानतो.’’
माधुरी संपत याचा मुलगा रशीश संपत म्हणाला, “आई कुठलंही काम कोणाच्या आधाराविना करू शकत नाही. घराबाहेरही जात नसूनही तिला कोरोनाचा संसर्ग झाला हे अतिशय दुदैवी आहे. परंतु, तिच्या इच्छाशक्ती आणि योग्य उपचारांमुळे तिने या आजारावर मात केली आहे. वृद्ध रुग्ण या प्राणघातक आजारावर मात करू शकणार नाहीत, हा गैरसमज आहे हे माझ्या आईनं दाखवून दिलं आहे.’’