१९९३ मुंबई ब्लास्ट : कोर्ट काय देणार निर्णय?
कुख्यात आबू सालेम आणि इतर ५ पाच जणांचा आज (गुरूवार) फैसला होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या प्रकरणाचा निकाल देणार आहे. राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात आबू सालेम आणि इतर ५ पाच जणांचा आज (गुरूवार) फैसला होणार आहे. विशेष टाडा न्यायालय या प्रकरणाचा निकाल आज देणार आहे. या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
न्यायालयाने जून महिन्यात दिलेल्या निकालानूसार अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल, रशिद खान, ताहिर मर्चंड, करीम मुल्ला खान आणि रिजाय सिद्दीकी यां सहा जणांना बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवले होते. तर, अब्दुल कादीर याला दोषमुक्त केले होते. दरम्यान, या आरोपींपैकी मुस्तफा डोसाचा तुरूंगात मृत्यू झाला आहे. त्यामुळे उर्वरीत पाच दोषींनाच शिक्षा दिली जाणार आहे. या बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, टाडा न्यायालयाने साखळी बॉम्बस्फोटातील एकूण १२९ आरोपींपैकी १०० आरोपींना आतापर्यंत दोषी ठरवले आहे. त्यापैकी काहींना ६ महिने तर काहींना मरेपर्यंत जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.
याकूब मेननला फाशी
१९९३ च्या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण २७ आरोपी अजूनही फरार आहेत.
अभिनेता संजय दत्तलाही शिक्षा
दरम्यान, या बॉम्बस्फोट प्रकरणी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त यालाही न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. संजय दत्त ही शिक्षा भोगून आता बाहेर आला आहे.
थोडक्यात
देशाची आर्थिक राजधानी असलेले आणि जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेले मुंबई शहर १२ मार्च १९९३ या दिवशी हादरून गेले. या दिवशी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जण मृत्युमुखी पडले. तर, ७१३ जण जखमी झाले. हा बॉम्बस्फोट इतका शक्तीशाली होता की, यात २७ कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी तब्बल ३ हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त १० टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला होता.