Coronavirus: पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल बंद
पश्चिम रेल्वेमार्गावर काल आणि आज होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आलेले काही जण प्रवास करताना आढळून आले होते.
मुंबई: कोरोना व्हायरसचा (COVID-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पश्चिम रेल्वेकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेमार्गावरील वातानुकूलित रेल्वेसेवा (AC local) ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी नेहमीच्या लोकल ट्रेन या मार्गावर धावतील.
गेल्या काही दिवसांमध्ये COVID-19 व्हायरस वेगाने मुंबईत फैलावत आहे. त्यामुळे बस आणि ट्रेनमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारकडून नागरिकांना करण्यात आले आहे. यानंतर लोकांची संख्या काहीप्रमाणात कमी झाली असली तरी अजूनही गर्दी पूर्णपणे ओसरलेली नाही.
'कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय, धोक्याचा भोंगा वाजलाय, आता सावध व्हा'
अशातच पश्चिम रेल्वेमार्गावर काल आणि आज होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आलेले काही जण प्रवास करताना आढळून आले होते. आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या सहा प्रवाशांना आज ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेसने बडोद्याला जात होते. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटली. मात्र, यामध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यानंतर सौराष्ट्र एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात थांबवण्यात आली. यानंतर या सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवण्यात आले.
दुपारच्या उन्हात उभे राहील्यास कोरोना निघेल, भाजप नेत्याचा अजब सल्ला
तर काल मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आलेले चार जण आढळून आले होते. तिकीट तपासनीसाला यांच्या हातावरचा होम क्वारंटाईनचा शिक्का दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर या चौघांना पालघर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले होते.