मुंबई : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने किडनी प्रत्यारोपणासाठी लाच मागितल्याप्रकरणी दोघांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्यांपैकी सचिन साळवे हा रहेजा रूग्णालयात समन्वयक आहे तर तुषार सावरकर हा जे. जे. रूग्णालयात समाजसेवा अधिक्षक म्हणून काम करायाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमालुद्दीन खान नावाच्या ४० वर्षीय इसमाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. त्यांना तातडीने किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. त्यांच्या मेहुण्याच्या पत्नीने जमालुद्दीन यांना किडनी देण्याच मान्य करताच कुटुंबीयांनी माहिमच्या एस. एल रहेजा रूग्णालयाशी संपर्क केला. नियमानुसार जमालुद्दीन यांची फाईल जे. जे. रूग्णालयात परवानगीसाठी पाठवण्यात आली. 


मात्र या फाईलमधील काही मुद्यांवर शंका उपस्थित करण्यात आली. दरम्यान रहेजा रूग्णालच्या को आॅर्डीनेटर सचिन साळवेने फाईल क्लिअर करण्यासाठी जे. जे. रूग्णालयाचा समाजसेवा अधिक्षक तुषार सावरकरला दीड लाख द्यावे लागतील असे सांगितले. तडजोडीअंती ८० हजार रूपये देण्याचे ठरले. 


दरम्यान जमालुद्दीन यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा लावला आणि लाच घेताना सचिन साळवेला रंगेहाथ अटक केली. मंगळवारी या दोघांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने दोघांना चार तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.