`वर्क फ्रॉर्म होम` नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
पुढील १-२ दिवसांत कंपन्यांमध्ये भेट देऊन याबाबत चेकिंग होणार
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्या कंपन्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्याच्या नियमाची अंमलबजावणी करत नसतील, तर त्यांच्यावर आयपीसी कलम १८८ अंतर्गत दंडाची कारवाई होऊ शकते. पुढील १-२ दिवसांत कंपन्यांमध्ये भेट देऊन याबाबत चेकिंग होणार असल्याची माहिती मुंबई आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली आहे.
मुंबईला कोरोना व्हायरसच्या स्टेज ३ मध्ये घेऊन जायचं नसेल तर काळजी घेणं गरजेचं आहे. आपत्ती ही संधी मानून थुंकणाऱ्यांवर अधिक दंड कायमस्वरूपी आकारला जाणार आहे, यामुळे टीबीलाही आळा बसेल असंही ते म्हणाले. मुंबई महापालिका मुख्यालय आणि वॉर्ड ऑफिसमध्ये नागरिकांनी येऊ नये, यासाठी त्यांच्या तक्रारी इमेल, टेलिफोन नंबर १९१६ वर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच सर्व वॉर्ड ऑफिसला व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा देण्यात आली आहे.
मिडल ईस्ट देशांमधून, मोठ्या प्रमाणात प्रवासी येणार आहेत. येथे आल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवावं लागणार आहे. त्यासाठी मोठ्या जागेची आवशक्यता आहे. त्यामुळे खाजगी रूग्णालयांचा वापर क्वारांटाईसाठी केला जाण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
अनेक हॉटेल्स स्वत:हून रूम देत आहेत, सर्व व्यवस्था करत आहेत, हॉटेलमध्ये केवळ जे प्रवाशी बाहेरुन आलेले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. येथे कोरोना रुग्णांना ठेवत नसून, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल जातं असल्याची माहिती प्रविण परदेशी यांनी दिली आहे.
दरम्यान, सरकारी कार्यालयांमध्येही ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम व्हावं असा निर्णय घेतला जाऊ शकतं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२वर पोहचली आहे. आतापर्यंत ८०० जणांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना संशयित किंवा एखादा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाशी दुजाभाव न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.