दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : रुस्तमजी रिअॅलिटी या विकासकाच्या मुंबईतील एका प्रकल्पाला स्थगिती देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात विधानसभेत दिलं होतं. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या स्थगितीबाबत पुढील कारवाई न केल्याने त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील अंधेरी येथील रुस्तमजी रॅअलिटीमार्फत विकसित करण्यात येणाऱ्या म्हाडा वसाहतीच्या कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्याला विखे-पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून उत्तर दिले. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते असताना विखे-पाटील यांनीच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला स्थगिती देण्याचं आश्वासन विधानसभेत दिलं होतं. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्थगिती देण्याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. 


आज पुन्हा या विषयावरील लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर रुस्तमजी रिअॅलिटीने केलेल्या गैरव्यवहाराचे मुद्दे पुन्हा एका विधानसभेत उपस्थित करण्यात आले. तसंच याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री म्हणून विखे-पाटील यांनी म्हाडा अधिकाऱ्यांवर कारावाई करण्याचं आश्वासन दिलं असून या प्रकल्पाला स्थगिती देण्याचं आश्वासनही दिलं आहे.


मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतरही त्याबाबत कारवाई न करणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.