BMC ELECTION 2022 : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी असा आहे भाजपचा अॅक्शन प्लान
मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार भाजपच्या बैठकीत करण्यात आला
BMC ELECTION 2022 : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईत महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) केवळ भारतीय जनता पक्षाचं (BJP) कमळ फुलणार हा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या अध्यतेखाली भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार यांची मुंबईत बैठक पार पडली. तब्बल चार तास ही बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shalar) यांनी बैठकी करण्यात आलेल्या चर्चेबाबत माहिती दिली.
पालिकेसाठी भाजपाचा निर्धार
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही येवोत, महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना चारही मुंड्या चीत करण्यासाठी मुंबईतल्या जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा ठोस कार्यक्रम या बैठकीत ठरवण्यात आल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. त्याची रचना तयार केली आहे, काही गोष्टींची उजळणी केली आहे. काही आगामी कार्यक्रमांची तयारीसुद्धा सुरु झाली असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.
या सर्व चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई पालिकेत केवळ भाजपाचंच कमळ फुलणार, हा संकल्प घेऊन आम्ही बैठक घेतल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.