कंगना रनौत हिचे मुंबई पोलीस, राज्याच्या गृहमंत्र्यांना पुन्हा खुले आव्हान
अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा खुले आव्हान दिले आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा खुले आव्हान दिले आहे. आपली ड्रग्ज टेस्ट करावी तसेच कॉल रेकॉर्ड तपासावेत. दोषी आढळल्यास कायमची मुंबई सोडू, असे कंगनाने म्हटले आहे.
कंगनाविरोधात विधिमंडळात हक्कभंग
कंगना रानौत मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. हिमाचल प्रदेशला आपल्या घरी गेलेल्या कंगना रानौतला मनालीमध्ये पत्रकारांनी गाठले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबाबत प्रतिक्रिया विचारताच कंगनाने आता मी काही बोलणार नाही, असे सांगत मुंबईला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतचा काही संबंध आहे का, याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचे सांगितले आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रनौतने ट्विट केले आहे. आपली ड्रग्ज चाचणी करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु आणि कायमची मुंबई सोडू, असे तिने म्हटले आहे.
कंगनाने ट्विट करताना म्हटले आहे, 'मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय.'