चक्रीवादळादरम्यान झालेल्या पावसामुळे 7 तलावांमध्ये पुरेसा जलसाठा
४ दिवसात सर्वाधिक पाऊस विहार आणि तुळशी तलाव क्षेत्रात झाल्याने पुरेसा जलसाठा तयार झाला आहे.
मुंबई : तौत्के चक्रीवादळा दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 6 तलाव क्षेत्रांमध्ये झालेल्या पावसामुळे जलसाठा वाढला आहे. 4 दिवस झालेल्या या पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. 210 मिली मीटर पाऊस हा विहार तलाव क्षेत्रात झाला असून, त्यानंतर तुळशी तलाव क्षेत्रात 178 मिली मीटर, मोडक सागर क्षेत्रात 102 मिली मीटर, मध्य वैतरणा जलाशय क्षेत्रात 62 मिली मीटर, तानसा 59 मिली मीटर, भातसा 29 मिली मीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर, अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रामध्ये पावसाची नोंद झाली नाही.
मुंबईला या सातही तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईत दररोज तब्बल 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पाणीपुरवठा 7 तलावांमधील जलसाठ्यातून केला जातो.
7 पैकी 5 तलाव हे महापालिकेच्या अखत्यारित आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील तुळशी व विहार या 2 तलावांसह मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा या मनपा क्षेत्राबाहेरील तलावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित अप्पर वैतरणा व भातसा हे 2 तलाव (धरण) राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत.