महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ आहे का? निवडणुकीसाठी बैठक रद्द केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप
खोके सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. औषध पुरवठ्याचा प्रश्न सोडून यांना निवडणूकांची काळजी जास्त हे दिसतंय, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय
राज्यातील सत्तातरानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde fadnavis government) ठाकरे गटाकडून सातत्याने टीका होतेय. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधत आहेत. राज्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन हे सरकार गुजरात निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करत आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ मिळणार आहे का? असा सवाल केला आहे.
'आज सकाळीच माझ्या कानावर एक बातमी आली की मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली आहे. दुसऱ्या राज्यात निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ही बैठक रद्द केल्याचे ऐकण्यात आले आहे. राज्यात ओला दुष्काळ, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न उभे आहेत. मात्र खोके सरकारला या प्रश्नासाठी 1 तास बैठक देखील घेता येत नाही. याउलट ते गुजरात निवडणुकीचा प्रचार करत आहेत, हे अत्यंत दुर्देवी आहे,' असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा ट्विट करत सरकारवर निशाणा साधला.
"महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने शिवसेनेचे आमदार गुजरातला पळवले, मग हक्काचे प्रकल्प गुजरातला नेऊन इथल्या तरुणांचा रोजगार पळवला. आता तिथल्याच निवडणुकीच्या प्रचारात हे सरकार व्यस्त आहे. 1 तासही यांच्याकडे नाही. काल मंत्रीमंडळाची बैठक का रद्द झाली? पीक विमा,ओला दुष्काळ,वीज प्रश्न अशा शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून परराज्यातल्या निवडणुकांवर खोके सरकार लक्ष केंद्रित करतंय. मंत्रीमंडळ बैठक रद्द होतेय. महाराष्ट्रात हे काय चाललंय? हे सरकार नेमकं आहे कुणासाठी? या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ मिळणार आहे का? 'महामंडळ' की 'प्राधिकरण'? अशा गोंधळात खोके सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. औषध पुरवठ्याचा प्रश्न सोडून यांना निवडणूकांची काळजी जास्त हे दिसतंय. तुम्ही शिवसेनेशी, शिवसैनिकांशी गद्दारी केलीत, पण महाराष्ट्रासोबत गद्दारी करू नका!," असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मनिषा कायंदे यांचाही गंभीर आरोप
"राज्य मंत्रीमंडळाची बैठक शिंदे फडणवीस सरकारने रद्द केली. एकीकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या बैठकीकडे लागले असताना शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातच्या निवडणुकांसाठी ही बैठक रद्द करुन राज्याचे मंत्रिमंडळच गुजरात भाजपच्या दावणीला बांधले आहे. राज्याचे मंत्रिमंडळ गुजरातमध्ये भाजप कसे जिंकेल यासाठी कामाला लागले असून राज्यातील जनतेच्या प्रश्नांचा या सरकारला पूर्ण विसर पडला आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या तथा आमदार मनीषा कायंदे यांनी केली.