मी निवडणूक लढवणार; आदित्य ठाकरेंची घोषणा
तुमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राची सेवा करायची आहे.
मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले. महालक्ष्मी येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी म्हटले की, मला अनेकदा शिवसेनेच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्राची सेवा कशी करता येईल, असा प्रश्न पडायचा. त्यामुळे आता मला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. तेव्हा सर्व शिवसैनिकांच्या परवानगीने आणि साक्षीने मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मला लहानपणापासूनच राजकारणाची आवड आहे. आजोबा आणि वडिलांसोबत अनेक दौऱ्यांवर तुम्ही मला पाहिले असेल. माझे मित्रही मला अनेकदा तू राजकारणात का जात आहेस, असा प्रश्न विचारायचे. तेव्हा मी त्यांना इतकेच सांगायचो की, मला राजकारण सोडून दुसरे काही जमणार नाही. आदित्य ठाकरेंच्या घोषणेनंतर शिवसैनिकांनी एक जल्लोष केला.
मुख्यमंत्री, आमदार बनण्यासाठी किंवा माझे स्वप्न साकार करण्यासाठी मी निवडणूक लढवणार नाही. तर मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. वरळीला जागतिक पातळीवर न्यायचे आहे. राजकारणात असल्यास एका निर्णयामुळे तुम्ही लाखो लोकांचं भविष्य घडवू शकता. त्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहत आहे, असं आदित्य यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी सेनेकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु होती. काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर वरळीचे आमदार सुनील शिंदे आणि इतर स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली होती. यामध्ये आदित्य यांना वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासंदर्भात अंतिम चाचपणी झाली होती.
आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यामुळे शिवसेना त्यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हती. मात्र, मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणाऱ्या सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळीचा बालेकिल्ला आणखी भक्कम झाला आहे. त्यामुळे वरळीतून आदित्य यांना निवडणुकीच्या रिंगणातून उतरवण्यास कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या अनेक भागांमध्ये फिरले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात सेनेला यश आले होते. मात्र, आता शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास आदित्य यांना वरळीत कितपत आव्हान निर्माण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.