अदित्य ठाकरेंच्याच मतदार संघात झळकले, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर
राज्यभरातून राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया उमटत असताना उद्धव ठाकरेंचे पुत्र अदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लागले आहेत.
मुंबई : शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला होता. शिंदे गटाने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार नको अशी भूमिका घेतल्याने, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यभरातून या घडामोडींवर प्रतिक्रिया उमटत असताना उद्धव ठाकरेंचे पुत्र अदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लागले आहेत.
आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले गेलेत. अमोल परब या शिवसैनिकानं हे बॅनर लावलेत. बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्या फोटोबरोबरच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत. मात्र शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष चेंबुरकर यांनी हे बॅनर उतरवले.
उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आज सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळतोय. काल दिवसभरात घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या अडीच वर्षांत मातोश्री हेच सत्ता केंद्र होतं.