दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात दुसरे ठाकरे पाहायला मिळणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारातील आदित्य ठाकरे हे आकर्षण ठरतील. त्यांना राज्यमंत्री की कॅबिनेट मंत्रिपद देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेच्या उदय सामंत, अनिल परब, शंभुराज देसाई या नव्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दोन अपक्षांना स्थान दिलं आहे. बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलंय. या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेत तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळचे अपक्ष आमदार आहेत.


महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून अब्दुल सत्तार यांना स्थान मिळणार आहे. १९९५ साली युती सरकारच्या काळात शिवसेनेने साबीर शेख यांना मंत्री केलं होतं. आता पुन्हा अब्दुल सत्तार यांच्या रुपानं मुस्लीम मंत्री दिला आहे. अब्दुल सत्तार सिल्लोड मतदारसंघातून विजयी झाले आहेत. निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.