Davos 2024 : आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्होस दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वित्झर्लंडच्या दाव्होस दौऱ्याकडे बोट दाखवत आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे परराष्ट्र मंत्रालयाच्या मान्यतेशिवाय दाव्होस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 50 हून अधिक लोकांना घेऊन जात आहेत. फक्त 10 लोकांसाठी परवानगी मागितली होती, तर पती-पत्नी आणि मुलांसह 50 जणांना नेले जात आहे.  परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती होती का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. "कोणत्याही दौऱ्यावर जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची आणि वित्त खात्याची परवानगी लागते. आम्ही दाव्होसला गेलो होतो तेव्हा कोणतीही अडचण आली नाही. सर्व नावांची यादी आम्ही दिली होती. केंद्रातून 10 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. पण 50 लोकांना शिष्टमंडळ म्हणून घेऊन जात असाल तर बाकीच्यांची परवानगी घेतली आहे का? माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही. त्या 50 लोकांमध्ये मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, एक खासदार आहेत. त्यांचा खर्च कोण करणार आहे. त्यामध्ये एक माजी खासदार देखील आहे," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.


"परदेश दौऱ्यात पाच ते सहा लोक जाऊ शकतात तिथे एवढी लोक कशाला? एमएमआरडीएमधून पाच, महा प्रिंटमधून पाच ते सात, एमएसआरडीसीमधून तीन ते चार, मुख्यमंत्र्यांचे दोन तीन स्वीय सहाय्यक, एका उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी असे सर्व लोक जात आहे. दोन तीन दलाल देखील घेऊन चालले आहेत. दाव्होसची लांबी एक किलोमीटर देखील नसेल. एवढे सगळे लोक दाव्होसमध्ये मजा करण्यासाठी चाललेत की काम करण्यासाठी हा प्रश्न पडतो. खरोखर काम करायचं असेल तर मुख्मयमंत्री दोन ते तीन अधिकारी घेऊन जाऊ शकतात. सही करण्यासाठी किती लोक लागतात. बॅग उचलायची असेल, गाडीला धक्का मारायचा असेल, खेळ खेळायचा असेल तर 50 लोक लागू शकतात. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात विचारलं पाहिजे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.


दरम्यान, 15 ते 19 जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दाव्होस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळासह दाव्होसला जाणार असून राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि 10 सदस्यीय शिष्टमंडळ दाव्होस येथे सहभागी होणार असल्याचे वृत्त होतं. मात्र आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यात 50 लोक जाणार असल्याचा आरोप केला आहे.


"दाव्होस दौऱ्यासाठी शिंदे सरकारने 10 जणांच्या शिष्टमंडळाची परवानगी मागितली होती. पण त्यात 70 जणांचा ग्रुप जाणार? परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती आहे का? सामान्यत: 50 जणांना राजकीय मंजुरी आवश्यक असते, कारण ते महाराष्ट्र सरकारच्या औपचारिक एजन्सीचे प्रतिनिधित्व करतात," असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.