मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनिवासी भागातील मॉल्स, हॉटेल आणि दुकाने रात्रीच्यावेळी सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेच्या शेवटी आदित्य ठाकरे यांच्या मिष्किल टिप्पणीने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाईट लाईफचा निर्णय संपूर्ण राज्यात किंवा पुण्यात लागू होणार का, असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुण्यात पहिले 'आफ्टरनून लाईफ' सुरु करुयात, अशी टिप्पणी आदित्य यांनी केली.



मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईत रात्रीच्यावेळी अनेक पर्यटक येतात. 


अशावेळी त्यांना खाण्यापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच शहरात रात्रीच्यावेळी काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आवश्यक होता.


मात्र, भाजपने सुरुवातीपासूनच नाईट लाईफला विरोध केला आहे. नाईट लाईफमुळे मुंबईत दारू पिण्याची संस्कृती फोफावेल. त्यामुळे निर्भया प्रकरणासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. ही संस्कृती आपल्या देशासाठी योग्य आहे का, याचा विचार सरकारने करावा, असे भाजप नेते राज पुरोहित यांनी म्हटले होते.