उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, शेअर केला `तो` कूल फोटो
आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलीय. गेली दोन वर्षे कोरोनामुळं वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला होता आणि कोरोना निर्बंधामुळं शिवसैनिकांना पक्षप्रमुख भेटू शकले नव्हते. परंतु आज सर्व शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवर उपस्थित आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वडिलांना इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.
आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोत उद्धव ठाकरे यांनी गॉगल लावला असून जीन्स आणि जॅकेट घातलं आहे. तर आदित्य ठाकरे हे कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून त्यांनी आपलं डोकं उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर ठेवलं आहे. या फोटोबरबर त्यांनी 'माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ते मला रोजच मी करत असलेली प्रत्येक गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करतात, तेही प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे.' असं कॅप्शन दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कमकुवत झाली असली तरी सामान्य शिवसैनिकांनी मात्र मातोश्रीवर आज गर्दी केलेली पहायला मिळतेय. उद्धव ठाकरेंनी हारतुरे, पुष्पगुच्छ, फोटोफ्रेम वगैरे काहीही नको...प्रतिज्ञापत्र आणा असं आवाहन केलं होतं. त्यानुसार कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळतोय.