मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचाच एकमेव अर्ज आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदित्य ठाकरे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरेंविरोधात अजून कुठल्याच पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केलेला नाही. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आदित्यविरोधात राष्ट्रवादी कोण उमेदवार देणार, की आदित्य ठाकरेंची बिनविरोध निवड होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 


तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात उतरल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अद्याप इथे राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तसेच बहुजन वंचितने उमेदवार दिलेला नाही. उद्या शेवटचा एक दिवस आहे. त्यामुळे येथून कोण अर्ज भरणार याकडे लक्ष लागले आहे.