मुंबई : येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे कामकाज पाहण्यासाठी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पालिका रुग्णालयात कामाचा प्रचंड ताण आहे त्या तुलनेने कर्मचारी वर्ग कमी असल्याने तांत्रिक कामकाज, प्रशासकीय प्रक्रीया, विद्युत संबंधीबाबी तसेच इतर यंत्रणा याची देखरेख  आणि व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नेमण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केईएम आणि सायन रुग्णालयासाठी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिगावकर, कूपर रुग्णालयासाठी के पूर्वचे सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे आणि नायर सर्वसाधारण आणि नायर दंत रुग्णालयासाठी पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


केईएम आग दुर्घटना, प्रिन्सची प्रकृती चिंताजनक


केईएम रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत हात गमवावा लागलेल्या प्रिन्सची प्रकृती खालावत चालली आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले असून त्याच्या हालचाली बंद झालेल्या आहेत. प्रिन्सला झालेले इन्फोक्शन अजूनही नियंत्रणात आलेले नाही. प्रिन्सला दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातून प्रिन्सच्या हृदयावर उपचार करण्यासाठी केईएमच्या बालरोग विभागात दाखल करण्यात आले. 


७ नोव्हेंबरला रुग्णालयातल्या ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर आग लागली होती. त्यात प्रिन्सला आपला हात गमवावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर त्याला दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली. सध्या प्रिन्स मृत्यूशी झुंज देत आहे.