बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : माहिम समुद्रकिनारी काही दिवसांपूर्वी मानवी अवयवांनी भरलेली सुटकेस आढळली होती. या घटनेनंतर माहिम परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या हत्येचा उलगडा झाला आहे. दत्तक मुलीनेच प्रियकरासोबत मिळून वडिलांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिम दर्ग्याच्या मागील किनाऱ्यावर २ डिसेंबरला एक सुटकेस आढळली होती. सुटकेसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा एक हात, एक पाय असे मानवी शरीराचे तुकडे होते. त्यानंतर माहीम पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला सुरवात केली. सुटकेसमध्ये मानवी अवयवांव्यतिरिक्त कपडेही आढळले. कपड्यांवरील कॉलरवर टेलरचं लेबल होतं आणि इथूनच तपासाला सुरुवात झाली. 


या कपड्यांवर टेलरच्या नावाचा मार्क आढळून आला. या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता संबंधित कुर्ला परिसरातील टेलरकडे चौकशी करण्यात आली. टेलरकडील पावती बुक बारकाईने पाहिलं असता, एका पावती बुकमधील कपड्याचा नमुना सुटकेसमध्ये सापडलेल्या शर्ट सोबत जुळला. या संदर्भात पोलिसांनी आयुब नावाच्या युवकाची चौकशी केली. त्याच्याकडे सुटकेसमधील शर्टशी मिळता जुळता शर्ट आढळून आला. 


आयुबचा या खुनाशी संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. चौकशीत आणखीन एका पावती बुकात त्याच रंगाचा कापडाचा नमुना व बेनेट असं नाव आढळून आलं. केवळ एक हात, एक पाय व गुप्तांग आढळून आल्याने पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख करणं कठीण होतं. पोलिसांनी मृत व्यक्तीचं फेसबुक प्रोफाइल तपासलं. बेनेट रिबेलो नावाच्या व्यक्तीचा फेसबुक प्रोफाइलवरील स्वाक्षरी असलेला फोटो व पावती बुकमधील स्वाक्षरी मिळून आली. यावरुन सुटकेसमधील अवयव बेनेट रिबेलो यांचेच असल्याचं तपासात समोर आलं.


दोन वर्षापूर्वी बेनेट रिबेलो यांनी आराध्या जितेंद्र पाटील (१९) या मुलीला दत्तक घेतलं होतं. मात्र आराध्याचे वाकोला परिसरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. या गोष्टीला मृत बेनेट रिबेलो (५९) यांचा विरोध होता. गेल्या काही महिन्यांपासून मृत बेनेट रिबेलो आरोपी आराध्याचं लैंगिक शोषण करत असल्याचं तिने जबाबात म्हटलं आहे. बेनेट २६ नोव्हेंबर रोजी घरात एकटे असताना आराध्या व तिच्या प्रियकराने लाकडी बांबूने मारहाण आणि चाकूने वार करुन त्यांना जखमी केलं. मात्र बेनेट याचा जीव जात नसल्याचं कळताच आराध्याने त्याच्या तोंडात बेगॉन स्प्रे मारला. बेनेट यांचा खून केल्यावर दोन्ही आरोपी ३ दिवस त्याच घरात मृतदेहाजवळ वावरत होते. या दरम्यान या दोघांनी सूरी गरम करुन बेनेटच्या शरीराचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये भरुन, सुटकेस मिठी नदीत टाकली. 


पोलिसांनी आराध्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरवातीला ती उडवाउडवीची उत्तरं देत होती. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला आहे. पोलीस याप्रकरणी मृत बेनेट रिबेलो यांच्या इतर अवयवांचा शोध घेत असून अधिक तपास सुरु आहे.