स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : सणासुदीचा हंगाम सुरू होताच कांद्याचे दर अचानक वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. अशातच दिवाळीत दिलासा देण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता हाच कांदा आता सामान्यांसह देशातील शेतकऱ्यांनाही रडवत आहे. कांद्याची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांद्याची आयात सुरू केली आहे. त्याचबरोबर येत्या 12 ते 15 दिवसांत राजस्थानमधूनही पंजाबमध्ये कांद्याची आवक सुरू होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात (APMC Market) अफगाणिस्तानचा (afghanistan) 30 टन कांदा दाखल झालाय. एकीकडे देशांतर्गत कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा कांदा परदेशात पाठविण्यावर केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानातून कांदा आयात झाल्याने केंद्र सरकारच्या या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. भारतीय कांद्याला किलोमागे 40 ते 45 रुपये असा चांगला बाजारभाव मिळत असून अफगाणिस्तानचा कांदा तुलनेने स्वस्त आहे. अफगाणिस्तानचा कांदा 30 ते 35 रुपये प्रति किलोने उपलब्ध असून यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेय. या आयाती मागे ऐन दिवाळीत केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा डाव आहे का असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलाय.


"एका बाजूला कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकरी मागणी करत आहेत. दुसऱ्या बाजूला उत्पादन कमी आहे म्हणून आपण अफगाणिस्तानचा कांदा इथे आणायचा प्रयत्न करताय. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कसा मिळेल. एखाद्यावेळी शेतकरी परदेशामध्ये माल पाठवत नाही. शेतकऱ्याचा माल परदेशात पाठवून नये म्हणूनही तुम्ही कायदे करता. दुसऱ्या बाजूला त्याच शेतकऱ्याला त्याच देशामध्ये जर चांगला भाव मिळत असेल तर सरकारने थोडी सकारात्मक भूमिका घ्यावी. आपण खाणाऱ्याचा विचार करता पण पिकवणाऱ्याचाही विचार करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे," असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.


दरम्यान, यंदा महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे नाशिकहून कांद्याची आवक कमी झाली होती. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात घसरण झाली होती. नाशिकमध्ये बाजार समितीमध्ये आवाक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. जवळपास आठशे ते नऊशे रुपये दराने घसरण झाली होती. यामुळे कांदा उत्पादक चिंतेत आले आहेत.