मुंबई महापालिकेच्या दणक्यानंतर अखेर ७५ टक्के खाजगी नर्सिंग होम सुरु
मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम आणि खाजगी दवाखाने अनेक ठिकाणी सुरु नसल्याने अनेक कोरोनाग्रस्त नसलेल्या नागरिकांना उपचार मिळण्यात मोठ्या समस्या येत होत्या.
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम आणि खाजगी दवाखाने अनेक ठिकाणी सुरु नसल्याने अनेक कोरोनाग्रस्त नसलेल्या नागरिकांना उपचार मिळण्यात मोठ्या समस्या येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन खाजगी नर्सिंग होम सुरु झाले नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर आज याबाबत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार महापालिका क्षेत्रातील 1 हजार 416 खाजगी नर्सिंग होमपैकी 1 हजार 68 एवढे खासगी नर्सिंग होम सुरु झाले आहेत.
तर महापालिका क्षेत्रातील 99 डायलिसिस सेंटरपैकी 89 सेंटर सुरु झाले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून सोमवारी देण्यात आली आहे.
एपिडेमिक ॲक्ट 1897 नुसार वैद्यकीय सेवा सुरु ठेवणं बंधनकारक आहे. मात्र असं असूनही, अनेकदा सूचना देऊनही दवाखाने बंद ठेवण्यात येत होते. त्यामुळे बंद असलेल्या खासगी दवाखाने आणि नर्सिंग होमवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. सूचना देऊनही अनेक खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम बंद ठेवण्यात येत होते.
दरम्यान, आता पालिकेच्या आदेशानंतर 75 टक्के खाजगी नर्सिंग होम सुरु झाले असले तरी इतर 25 टक्के नर्सिंग होम अजूनही बंद असल्याचं समोर आलं आहे. वारंवार सूचना देऊनही नर्सिंग होम आपली सेवा सुरु करत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होतेय.
महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सूचनांकडे ते सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने बंद असलेल्या नर्सिंग होमचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आणि याप्रकरणी सर्व संबंधितांना नोटीस देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.