पिवळी लाईन, 4 मिनिटांची डेडलाइन अन्...; राज ठाकरेंनी सांगितले टोल नाक्यासंदर्भातील नवे नियम
Dada Bhuse Meet Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Raj Thackeray On Toll : महाराष्ट्रात टोलवसुलीचा वाद वाढत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पुढील रणनीती पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासोबत चर्चा करुन प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसंदर्भातील यापुढे दिसणाऱ्या बदलांबाबत माहिती दिली आहे. मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती व मागण्यांबाबत माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.
"टोल घेणार असाल तर लोकांना कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता पुढचे 15 दिवस टोलनाक्यांवर कॅमेरे लावण्यात येणार आहे. यासोबत आमच्या पक्षाचेही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यातून किती गाड्यांची ये जा होते हे पाहिले जाणार आहे. गाड्यांची संख्या वाढल्यानंतर टोल वाढवले जातात. ठाण्यात झालेली टोलवाढ रद्द करण्यासाठी सरकारला एक महिन्यांची वाढ हवी आहे. प्रत्येक टोलनाक्यावर असलेल्या पिवळ्या लाईनच्या पलीकडे गाड्या गेल्या तर पुढच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून देण्यात येणार. चार मिनिटांच्या पलीकडे एकही गाडी टोलनाक्यावर थांबवणार नाही. ही सगळी यंत्रणा पोलिसांमार्फत राबवली जाणार आहे. टोल नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर तुम्हाला एकदाच पैसे भरावे लागतील. टोलनाक्यावरुन किती पैसे वसूल व्हायचे बाकी आहेत याची रोजच्या रोज आकडेवारी लिहीली जाईल. ठाणेकरांना आता एकतर आनंदनगर किंवा ऐरोली येथे एकदाच टोल भरावा लागणार आहे. याबाबत सरकार महिन्याभरात निर्णय घेणार आहे. ज्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता खराब आहे तिथला टोल रद्द करता येतो. त्यामुळे राज्य सरकार याबाबत केंद्रासोबत बोलणार आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच अवजड वाहनांना महिन्याभरात शिस्त लावण्यात येणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यासोबत एमएसआरडीटीचे 15 टोल नाके बंद करावे, अशी मागणीही राज ठाकरे यांनी मागणी केली आहे. तर सरकारने यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. टोल भरून चांगले रस्ते मिळत नसेल व दादागिरीची भाषा असेल तर काय उपयोग आहे? असा सवाल राज ठाकरेंनी केला. एक्स्प्रेसवेची कॅग चौकशी करा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे. राज्याला महसूल मिळणं गरजेचं आहे. पण टोल माफी हा विषय नाही. मात्र, टोलचे पैसे किती हे कळायला हवे, असेही ठाकरे म्हणाले.