फायर रोबोटनंतर आता फायर बाईक, मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव
फायर रोबोट फेल गेल्यानं फायर बाईकवर विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे
मुंबई : मुंबई अग्निशमन दलात (Mumbai Fire Brigade) फायर रोबोटनंतर आता लवकरच फायर बाईक (Fire Bikes) दाखल होणार आहेत. अरुंद गल्ल्या, दाटीवाटीच्या वस्तीत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) फायर बाईक्सची खरेदी करणार आहे.
मुंबई महानगरपालिकने ठेवला प्रस्ताव
मुंबई महानगरपालिकेने यासाठी 3.15 कोटी रुपयांचा प्रस्ताव आज नागरी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. मुंबई मनपा 24 फायर बाईक खरेदी करणार असन यामध्ये बाईकच्या एकूण देखभाल खर्चाचा समावेश आहे. एका फायर बाईकची किंमत 1 लाख 28 हजार आहे तर त्याच्यावरील फायर सिस्टीमसाठी, पाण्याच्या टाकीचा खर्च 10 लाख 22 हजार आहे.
फायर बाईकचे वैशिष्ट्ये
झोपडपट्ट्या आणि गजबजलेल्या परिसरात आग विझवण्यासाठी फायर बाईकचा मोठा फायदा अग्निशमन दलाला होणार आहे. फायर बाईकमध्ये 40 लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. 100 बार प्रेशरने आग विझवता येऊ शकते. 15 ते 20 मीटरपर्यंत जेट असून 20 मीटरपर्यंत आग आटोक्यात आणणं शक्य होणार आहे. बाईकला जोडलेला पंप 1 मिनिटात 8 लीटर पाणी फवारण्यास सक्षम आहे. या फायर बाईकवर अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी असतील, त्यापैकी एक ऑपरेटर आणि एक चालक असले. फायर बाईकवर सायरन बसवण्यात आल्याने वाहतूक कोंडीतून सहज मार्ग काढणं शक्य होणार आहे.
फायर बाईकला विरोधकांचा आक्षेप
मुंबई महानगरपालिकेने ठेवलेल्या प्रस्तावाला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आधीच फायर रोबोट फेल गेल्यानं 7 कोटी पाण्यात गेले आहेत, आता या फायर बाईक कशाला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. आधी या फायर बाईकचे प्रात्याक्षिक करुन दाखवावे अशीही मागणी करण्यात आली आहे.