अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : लोकसभा निवडणुकीत दणदणीत यशाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यामुळे मंत्रीमंडळ फेरबदल आता होणारच या चर्चेला ऊत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशासह राज्यात दणदणीत यश मिळालं असल्याने महायुतीमध्ये सध्या उत्साह संचारला आहे. महायुतीच्या नेत्यांना आता विधानसभेतील यशाचे वेध लागले आहेत. त्यापेक्षा आता आणखी नव्या लोकांना महायुतीमध्ये कोणाला आणता येईल याची चर्चा सुरू झाली आहे. नव्या लोकांच्या प्रवेशाची शक्यता असल्याने मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजपमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. तर शिवसेनेमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी प्रवेश केला आहे. 


राज्यातील या तगड्या नेत्यांना न्याय देण्याच्या निमित्तानं चार एक महिन्यांकरता का होईना मंत्रीमंडळात फेरबदल करण्यात येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच अन्न व नागरी पुरवठा,  ग्राहक संरक्षण आणि संसदीय कामकात अशी विविध खाती असलेले मंत्री गिरीष बापट हे आता खासदार म्हणून दिल्लीत जात असल्याने त्यांचीही खाती आता इतरांकडे सोपवावी लागणार आहेत. कृषीमंत्री पद हे राधाकृष्ण विखे पाटी यांच्याकडे जाणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.


जुनच्या पहिल्या आठवड्यात किंबहुना ६ तारखेला मंत्रीमंडळात फेरबदल होणार असे दावे राजकीय वर्तुळात केले जात आहेत. यानिमित्तानं उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला देणार का याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असेल. थोड़क्यात भाजप-सेना सरकारचे शेवटचे विधीमंडळ अधिवेशन तोंडावर येऊन ठेवलेले असतांना राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. असं चित्र सध्या दिसत आहे.