मुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या
मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला.
मुंबई : मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला. लोकल बंद असताना कार्यालय तसेच रुग्णालय गाठताना मोठी कसरत करावी लागत होती. राज्यशासनाच्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रविवारी रात्री राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत घेण्यात आला. त्यानुसार कालपासून दररोज पश्चिम रेल्वे मार्गावरच्या विरार ते चर्चगेट दरम्यान १४६ लोकल फेऱ्या होतील. तर, मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे अशा १३० फेऱ्या होणार आहेत. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल ७० फेऱ्या तसेच विरार ते डहाणू रोड दरम्यान १६ फेऱ्या धावणार आहेत.
तिन्ही मार्गावरून धावणा-या या ३६२ फेऱ्या फक्त राज्यशासनाच्या अखत्यारीतल्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी आहेत. जलद मार्गावरून १५ ते २० मिनिटांच्या फरकाने १२ डब्यांच्या लोकल गाड्या चालवल्या जातील. एका लोकलमध्ये साधारणपणे बाराशे प्रवासी बसू शकतात. मात्र आता सोशल डिस टंन्सिंग नियमामुळे ७०० कर्मचारीच प्रवास करू शकणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील प्रवासासाठी तिकिट वाटपाची जबाबदारी राज्य सरकारवर असणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून तिकिटांच्या आगाऊ पैशांसह कर्मचार्यांपची यादी रेल्वेला दिली जाईल. त्यानंतर रेल्वेकडून राज्य सरकारकडे सर्व तिकिटे राज्य सरकारकडे येतील. कामगारांचे तिकिट, थर्मल तपासणीची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे. सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांच्या मदतीला आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत.