आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार विरोधात धनगर समाजही रस्त्यावर
आज अनेक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिवसभर धरणं धरले जाणार आहे.
मुंबई: राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला असतानाच धनगर समाजही सरकारच्याविरोधात आज रस्त्यावर उतरणार आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज राज्यभर धनगर समाजाचे आरक्षणबाबत आंदोलन आहे. आज अनेक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिवसभर धरणं धरले जाणार आहे.
एकवाक्यतेचा अभाव
आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरण्यासाठी विविध ठिकाणी धनगर समाजाने मोर्चे, सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा संघटनांप्रमाणे धनगर समाजाच्या संघटनांमध्ये एकवाक्यता नाहीये. त्यामुळे समजाच्या विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे आंदोलन केले जाणार आहे.
येळकोट येळकोट जय मल्हार
लातूर जिल्ह्यात धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील बाभळगाव-निटुर रोडवर भुसणी पाटीजवळ धनगर समाजाच्या तब्बल एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेळ्या-मेंढ्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक आंदोलक हे पारंपरिक पेहरावात आले होते. येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत धनगर समाजाच्या आंदोलकांनी यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी ही केली. या आंदोलनामुळे लातूर- निटुर -निलंगा या मार्गावरील वाहतुक एक ते दीड तास खोळंबली होती. सरकारने धनगर आरक्षणावर तात्काळ निर्णय न घेतल्यास भविष्य उग्र आंदोलनाचा ईशारा ही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.