मध्य रेल्वे - ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल धावणार
मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल उद्या पासून सुरू होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल उद्या पासून सुरू होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ही वातानुकूलित लोकल धावणार आहे. ठाणे-पनवेल मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल धावणार आहे. उद्या केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वातानुकूलित लोकलला दाखवणार हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपूर्वी वातानुकूलित लोकल दाखल झाली आहे. दोन वर्षानंतर मध्य रेल्वे एसी लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेवरील पहिल्या एसी लोकलचे सारथ्य मोटर वुमन मनीषा म्हस्के करणार आहेत. सोमवार ते शुक्रवार ही एसी लोकल धावणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावरील पहिल्या वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाडीला सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री पनवेल येथून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करणार आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर पुरविण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांचेही लोकार्पण करतील. या वातानुकूलित गाडीच्या दररोज १६ सेवा ठाणे – वाशी - पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावर चालविण्याचे प्रस्तावित आहे.
एसी लोकलची वैशिष्ट्ये
प्रवासी आणि ड्रायव्हरसाठी वातानुकूलित व्यवस्था. प्रत्येक कोचमध्ये वातानुकूलनासाठी १५ टन क्षमतेच्या दोन रूफ माऊंटेड पॅकेज युनिट्स (आरएमपीयू). एअर स्प्रिंग सस्पेंशन: उत्कृष्ट राईड सोईसाठी आणि उपनगरी वाहतुकीच्या सुपर डेंशन क्रश लोड टिकविण्यासाठी, ईएमयू रॅकला प्रत्येक बोगीवर दोन एअर बेलसह दुय्यम निलंबन प्रदान केले जाते.
प्रवासी पत्ता आणि प्रवासी माहिती प्रणाली (पीएपीआयएस): इंटरकॉम सुविधा असलेल्या प्रवाशांसाठी जीपीएस आधारित माहिती प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे प्रवासी माहितीची सुविधा, ईटीयूमार्गे प्रवासी संभाषण, ड्रायव्हर / गार्ड ते प्रवासी संभाषण, गाडी रेडिओद्वारे प्रवासी माहितीची सुविधा असणार आहेत.
प्रत्येक कोचमध्ये कोच डिस्प्ले असून प्रत्येक कोचमध्ये दोन्ही बाजूंनी डिस्प्लेची सुविधा. हेड कोड डिस्प्ले असणार आहेत. दोन्ही दिशेला ड्रायवरच्या मागील डब्यांत इंग्रजी आणि हिंदीमध्ये एलईडी आधारित हेड कोड डिस्प्ले असणार आहेत.
एलईडी आधारित कोच ओळख प्रणाली असून अलार्म चेन पुलिंग तसेच दरवाजाच्या खराब स्थितीमध्ये एलईडी आधारित कोच ओळख प्रणालीची सुविधा असणार आहे. अर्गोनॉमिकली डिझाइन केलेले स्टेनलेस स्टील प्रवासी आसन असणार आहे.
बाहेरील विहंगम दृश्य दिसण्यासाठी विस्तृत आणि मोठ्या डबल-ग्लास सीलबंद खिडक्या असून वेस्टिब्यूल डिझाइन आहे. सहा डब्यांसाठी व्हॅस्टिब्यूलद्वारे एअर टाइट गँगवे (वेस्टिब्यूल). तर उत्तम प्रकाश व ऊर्जा संवर्धनासाठी एलईडी आधारित प्रकाशयोजना आहे. प्लेन बाजूच्या भिंतींसह प्रशस्त आणि मजबूत स्टेनलेस कोच असेल. पॉली कार्बोनेट पारदर्शक काचेसह अल्युमिनियम एक्सट्रुडेड मॉड्यूलर लगेज रेक असणार आहे.