VIDEO : विमान तब्बल बारा तास रखडलं, प्रवाशांचा मुंबई विमानतळावर राडा
एअर इंडियाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका
मुंबई : एअर इंडियाच्या (Air India) भोंगळ कारभाराचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. एक-दोन नाही तर तब्बल 12 तास विमान रखडल्याने प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) प्रवाशांनी अधिकाऱ्यांबरोबर एकच गोंधळ घातला,
नेमकी घटना काय?
नियोजित वेळेनुसार एअर इंडियाचं विमान सकाळी सात वाजता मुंबईहून अमृतसरला रवाना होणार होतं. यासाठी एकाच कुटुंबातील 22 जण मुंबईहून अमृतसरला जाण्यासाठी सकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावर आले. पण 12 तास उटल्यानंतरही या विमानाने उड्डाण केलं नाही. या दरम्यान इतर कोणत्याही विमानात या प्रवाशांना जागा देण्यात आली नाही.
तब्बल 12 तासापासून हे प्रवासी विमानतळावर वाट पाहात आहेत. याकाळात प्रवाशांचे प्रचंड हाल सहन करावे लागले. प्रवाशांमध्ये वयोवृद्ध आणि लहान मुलंही आहेत. पण एअर इंडियाकडून या प्रवाशांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. इतकंच नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याचीही कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.
आता तब्बल सतरा तासांनंतर म्हणजे रात्री साडेनऊ वाजता या प्रवाशांना घेऊन विमान अमृतसरसाठी रवाना होईल, असं सांगण्यात आलं आहे.