सहा महिन्यांत खरेदीदार न मिळाल्यास एअर इंडियाला टाळे ठोकणार
यासाठी एअर इंडियाकडून जून २०२० पर्यंतची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
मुंबई: येत्या सहा महिन्यांत कोणताही तोडगा न निघाल्यास एअर इंडियाला टाळे ठोकण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्यानुसार, येत्या सहा महिन्यात एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास किंवा कोणताही ठोस तोडगा न काढता आल्यास कंपनीची हवाई सेवा कायमची बंद होईल. यासाठी एअर इंडियाकडून जून २०२० पर्यंतची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या डोक्यावर तब्बल ६० हजार कोटीचे कर्ज आहे. परिणामी ही कंपनी सरकारसाठी पांढरा हत्ती झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून सरकारने एअर इंडियात निर्गुंतवणूक करण्याचा विचार सुरु केला होता. मात्र, हा निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. सध्या १२ छोटी विमाने सुरू करण्यासाठीही आणखी निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी केंद्र सरकारने एअर इंडियात २,३४५ कोटी रुपयांचे भांडवल टाकण्यासाठी संसदेची मंजुरी मिळवली होती. २०११-१२ या आर्थिक वर्षापासून ते आतापर्यंत सरकारने एअर इंडियाला जवळपास ३० हजार ५२० कोटी रुपयांची निधी दिला आहे.
तसेच केंद्र सरकारने एअर इंडियातील समभागांचा काही वाटा विकण्याची योजना आखली होती. यामध्ये सरकारने ७६ टक्क्यांपर्यंतची मालकी विकण्याची तयारी दाखविली होती. मात्र, त्यासोबत गुंतवणूकदारांना २४ हजार कोटी रुपयांचे कर्ज व ८ हजार कोटींची देणी असा दुहेरी भार उचलावा लागणार होता. परिणामी गुंतवणूकदारांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता.
आतादेखील एअर इंडिया विकत घेण्याची तयारी कुणी दाखवली तरी सगळे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागतील. मात्र, सध्याची स्थिती बघता एअर इंडिया खरेदी करण्यासाठी कोणी गुंतवणूकदार पुढे सरसावण्याची शक्यता फारच कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.