नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाचा आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हेच उपमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवारांच्या नावावर राष्ट्रवादीत एकमत झाल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील अजित पवारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत सकारात्मक असल्याचंही समजतंय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीदेखील या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांशीही चर्चा केल्याचं समजतंय. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागांतील नेत्यांची मतं विचारात घेण्यात आल्याचं समजतंय.  अजित पवार यांची प्रशासनावरची घट्ट पकड दिसून येते, त्यामुळेच त्यांच्या नावाला सर्वांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं सांगण्यात येतंय.  (अधिक वाचा - देशमुख बंधुंना ४ कोटी ७० लाखांची कर्जमाफी? व्हायरल दाव्यावर रितेशनं सोडलं मौन)


शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतरही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच समोर आली होती.


त्यामुळे लवकरच अजित पवार हे पुन्हा एकदा उप-मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसण्याची शक्यता आहे. याआधी काही दिवसांपूर्वी भाजपशी हातमिळवणी करता अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसले होते. (अधिक वाचा - मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना आमदार आदित्य ठाकरेंची उपस्थिती वादात)



दरम्यान, महाराष्ट्रातील खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. खाते वाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत आहेत. आज संध्याकाळी काँग्रेस नेते मुंबईत परत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांची बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. महाराष्ट्र विकास आघाडीत कुठली खाती कुठल्या पक्षाला द्यायची याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. काही खात्यांवरून अजूनही तीन पक्षात मतभेद आहेत. त्यामुळे आजचं खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.