`विधीमंडळ सदस्य नसलेलेही मुख्यमंत्री झाले`; अजित पवारांच्या मनात नेमकं काय?
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण अजूनही भाजप-शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरुच आहे. त्यातच आता अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केलेली आहेत. याआधीही विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. मग कोणी राज्यसभेचा सदस्य असेल, कुणी लोकसभेचा, असं अजित पवार म्हणाले आहेत.
शिवसेनेला केवल अडीच वर्षेच नव्हे तर पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची संधी असल्याचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शरद पवार हे दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत नेमकं काय ठरतं यावर पुढची राजकीय समीकरणं अवलंबून असल्याचं अजित पवारांनी नमूद केलं आहे.
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक घेत आहेत. ही बैठक झाल्यानंतर शरद पवार उद्या दिल्लीमध्ये सोनिया गांधींना भेटतील. शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसमध्येही दोन गट असल्याचं चित्र आहे.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधीच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील, असं सांगितलं. तर शिवसेनेकडून सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला, तर त्याला पाठिंबा द्यावा, असं पत्र काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधींना लिहिलं आहे. भाजप आणि शिवसेनेत फरक असल्याचं दलवाईंनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांनी मात्र शिवसेनेसोबत जायला विरोध केला आहे. हुसेन दलवाईंसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.