देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरीच्या वारीच्यानिमित्ताने भेदभावाचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंढरीला पायी जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक वारकरी संस्थांना प्रातिनिधिक स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये विदर्भातील एकाही वारकरी संस्थेचा समावेश नाही. हा विदर्भातील वारकऱ्यांशी दुजाभाव आहे. या वारकऱ्यांवर अन्याय झाला आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतिहासिक निर्णय! देहू आळंदी पायी पालखी सोहळा पहिल्यांदाच रद्द


राज्यातील लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्याना यंदा परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्या मधील वारकरी प्रतिनिधींची एक बैठक घेऊन यातील पाच प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, विदर्भातील एकाही वारकरी प्रतिनिधीला पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात न आल्याने हा त्यांच्यावर अन्याय आहे. विदर्भ हीदेखील संतांची भूमी आहे. अनेक वारकरी विदर्भातुन चालत पंढरपूरला येतात. शासनाने दिलेला निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी पुण्यातील वारकरी प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तशीच परवानगी विदर्भातील वारकरी प्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी या वारकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी बैठकीला विदर्भातील एकाही वारकरी संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावले नव्हते. अजित पवार यांनी वारकऱ्यांमध्येही राजकारण केले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालावे आणि विदर्भ आणि बिगरविदर्भ अशी जी विभागणी झाली आहे, त्याकडे लक्ष द्यावे. तसेच विदर्भातील तीन ते चार वारकरी संस्थांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.