मुंबई: शरद पवार यांचा स्वत:हून सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) जाण्याचा निर्णय न पटल्यामुळेच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांकडे तडकाफडकी आपला राजीनामा सोपविला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळेच अजित पवार यांनी हा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात निर्णयप्रक्रियेवरून वादावादी सुरु आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील अनेक भागांमध्ये यात्रेला चांगला प्रतिसादही मिळाला. 


मात्र, यादरम्यान ईडीने राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणात शरद पवार, अजित पवार आणि अन्य संचालकांवर गुन्हा दाखल केला. यानंतर शरद पवार यांनी स्वत:हून ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. याच कारणावरून अजित पवार नाराज झाल्याचे समजते. 


शरद पवार स्वत:हून ईडीसमोर हजर झाल्यास ते एकप्रकारे इतरांच्या चौकशीला आमंत्रण दिल्यासारखे होईल. त्यामुळे या राज्य सहकारी बँकेच्या ७० संचालकांची चौकशी करण्याचा मार्ग मोकळा होईल. यामध्ये अजित पवार हे एकमेव माजी मंत्री असलेले संचालक आहेत. त्यामुळे शरद पवार यांची ही चाल आपल्यासाठी प्रतिकूल ठरू शकेल, अशी भीती अजित पवार यांना होती. त्यामुळे आज सकाळपर्यंत अजित पवारांकडून शरद पवार यांची मनधरणी सुरु होती. मात्र, शरद पवार हे शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले. त्यामुळेच अजित पवार यांनी राजीनामा देऊन आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. 


शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मुंबईत दाखल झाले होते. मात्र अजित पवार हे मुंबईत दाखल झाले नव्हते. त्यावरही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अजित पवार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत होते.


दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा देताना आगामी वाटचालीविषयी भाष्य करण्यास नकार दिला. अजित पवार यांचा मुलगा पार्थ यालाही अजित पवारांनी आपल्या निर्णयाविषयी कल्पना दिली नव्हती. साहेबांच्या या निर्णयामुळे मीदेखील आश्चर्यचकित झाल्याचे पार्थ यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले.