मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार... राज्यामध्ये मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या दोघांनीही शपथविधी घेत सगळ्यांनाच धक्का दिला. पण या दोघांनी वापरलेलं हे धक्कातंत्र औटघटकेचं ठरलं. ८० तासांमध्ये या दोघांनी स्थापन केलेलं सरकार कोसळलं आणि राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्यातल्या या दोन बड्या नेत्यांचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो. वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवारांच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांनीही लगेच रिप्लाय दिला. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले, तसंच अजित पवार यांनाही फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या. 



कोरोनाच्या संकटात वाढदिवस साजरा करू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनी कोणतेही कार्यक्रम, भेटीगाठी न करता, त्याऐवजी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची मदत करावी, असे आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिराती, होर्डिंग, उत्सव याऐवजी सेवाकार्यात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असं भाजपने कार्यकर्त्यांना सांगितलं.