Ajit Pawar : सध्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे ती मुख्यमंत्री पदाची आणि  राजकीय भूकंपाची.  राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी (Uday samant) केला. राष्ट्रवादीचे 20 आमदार शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु असल्याचा दावा सामंत यांनी केला. यामुळे राष्ट्रवादीचे हे 20 आमदार कोण? अशी चर्चा आहे. याविषयी राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न विचारला असता ते प्रचंड चिडले. आपल्या खास शैलीत अजित पवार यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले (Maharashtra Politics).  


उदय सामंत यांनी काय गौप्यस्फोट केलाय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केले आहे. ठाकरेंसोबत उरलेले 13 आमदार, राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सुरु असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे-ठाकरे वादाचा कधीही निकाल लागू शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात भूकंपाच्या चर्चांना उधाण आले. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. 


उदय सामंत यांच्या दाव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया


आमचे राष्ट्रवादीचे आमदार 20 कुणाच्या संपर्कात नाहीत आणि ते देखील आमच्या संपर्कात नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कुणी असतील तर आम्हाला माहित नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे यामुळे या विषयी तेच सांगू शकतात असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.  


राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होणार 


राज्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झालीय. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता सगळ्यांनीच मान्य केलंय असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी देखील हे सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 


बारसू प्रकल्पात कुणीही राजकारण आणू नये - अजित पवार


कोकणातील बारसू रिफायनरीला विरोधी पक्षनेते अजित पवारांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट दिसतंय. बारसू प्रकल्पात कुणीही राजकारण आणू नये. हा प्रश्न संवेदनशीलपणे सोडवावा, अशी भूमिका अजित पवारांनी मांडलीय. सत्ता कुणाचीही असो, अन्याय करण्याची भूमिका नाही, असं सांगतानाच कायदा हातात घेऊ नका, अशी सूचना त्यांनी सरकारला केली. शिवाय विरोध करणा-यांशी चर्चा करा, असा सल्लाही त्यांनी दिला.