मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केलेल्या अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे गटनेते असताना अजित पवारांनी त्यांच्या आमदारांच्या भाजपच्या समर्थनाचं पत्र राज्यपालांना दिलं. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यात खळबळ माजली. यानंतर शरद पवार यांनीही ही अजित पवारांची वैयक्तिक भूमिका आहे, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही, असं स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांना गटनेतेपदावरून काढून टाकून त्यांच्याऐवजी जयंत पाटील यांचीही निवड केली.


महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका दिवसाची मुदत दिली. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदान नाही तर लाईव्ह टेलिकास्ट करा, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.


उद्या सकाळी ११ वाजता आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल आणि ५ वाजता हा कार्यक्रम संपेल. ५ वाजता हंगामी अध्यक्ष बहुमत चाचणी घेईल. ही चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणात ही चाचणी होणार आहे.