मुंबई : अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा अचानक राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता भाजपने अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जलयुक्त शिवार' योजनेचे यश तर बघा, अनेक राजकारणी आजकाल राजीनामा देऊन 'शेती' करण्याच्या विचारात आहेत, असं ट्विट भाजपने केलं आहे. मुख्य म्हणजे या ट्विटमध्ये भाजपने अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही टॅग केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीनामा देण्याआधी अजित पवार यांचं त्यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. राजकारण खालच्या पातळीला गेलं आहे, त्यामुळे राजकारण सोडून आपण शेती करु, असं अजित पवार यांनी पार्थला सांगितल्याचं शरद पवार यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. यावरूनच भाजपने अजित पवार यांच्या राजीनाम्यावर टीका केली आहे.


अजित पवारांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जवळपास २० तास कोणाच्याही संपर्कात नव्हते. यानंतर अखेर ते मुंबईमध्ये शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकमध्ये पोहोचले. या ठिकाणी पवार कुटुंबियांची बैठक सुरु आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार उपस्थित आहेत. पण राजेंद्र पवार आणि रोहित पवार मात्र या बैठकीला हजर नाहीत.


राजीनामा देताना अजित पवार यांनी कोणालाच सांगितलं नाही. एवढच नाही तर अजित पवार यांनी आपल्याशी चर्चा केली नसल्याचं पवारांनी काल सांगितलं. माझे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात आल्याने ते अस्वस्थ होते. अस्वस्थता आणि उद्विग्नेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असवा, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.